ढाणकी : १६ मे ( राजहिरा लाईव्ह न्युज )
संपादक : दिलीप मुनेश्वर
यवतमाळ, दि.१६ : कृषी विभागाच्या पथकाने ढाणकी येथे अनधिकृत खत साठ्यावर मोठी कारवाई करत १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधितांविरोधात खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १४ मे रोजी ढाणकी येथे उभ्या असलेल्या एका ट्रकची कृषी विभागाच्या पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ‘एचएमएम इंडस्ट्रीज, बिकानेर’ उत्पादित तसेच ‘आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर’ यांच्या बिलासह संशयास्पद जिप्सम पावडर आढळून आली. यावेळी ५० किलो वजनाच्या एकूण ७०० गोण्या जप्त करण्यात आल्या.या कारवाईत मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) राजेंद्र डांगारे, कृषी अधिकारी संजय गुज्जलवार, कृषी अधिकारी भारत चेके तसेच वरिष्ठ लिपिक मोरेश्वर अम्मडवर यांनी सहभाग घेतला.पथकाने जिप्सम पावडरसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड ट्रक असा एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जगदीश प्रसाद (रा. हनुमाननगर, जिल्हा नागोर, राजस्थान) व अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी कृषी अधिकारी राजेंद्र डांगारे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विकास अधिकारी लहुदास आडे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कोटजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करताना, केवळ अधिकृत वितरकाकडूनच खरेदी करावी, जेणेकरून फसवणूक टाळता येईल आणि भविष्यात पीक व आर्थिक नुकसान होणार नाही. – विकास मीना, जिल्हाधिकारीशेतकरी व नागरिकांना अशा संशयास्पद किंवा बनावट निविष्ठा बाबत माहिती मिळाल्यास, कृषी विभागाला द्यावी, जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. – मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी







