(राजहिरा लाईव्ह न्युज उमरखेड),
संपादक दिलीप मुनेश्वर
आज लावलेले झाड, उद्याच्या पिढीची अमूल्य संपत्ती असून भविष्याची सोय म्हणून ही संपत्ती निर्माण करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने रोपे लावून लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रीकांत कलाने यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन येथील प्रा. डॉ. श्रीकांत कलाने तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शंकर वाघमारे उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेचे महत्त्व आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगून राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी, नेतृत्वगुण, शिस्त आणि सेवाभाव निर्माण करणारी प्रभावी चळवळ असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शंकर वाघमारे यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाविद्यालय परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा; पर्यावरण वाचवा” असा संदेश देत स्वयंसेवकांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी बोक्से आणि अंकिता देशमुख यांनी केले तर प्रीती सोनटक्के या स्वयंसेवक विद्यार्थिनीने आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. टी. एम. भगत, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. आर. जीवतोडे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. पी. निंभोरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. बी. कनवाळे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.ए. जे. सूर्यवंशी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. साधना देवसरकर आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.







