विडूळ येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; निष्काळजी चालकाविरोधात गुन्हा !!
विडुळ : २१ मे ( राजहिरा लाईव्ह न्युज) संपादक : दिलीप मुनेश्वर
उमरखेड : -तालुक्यातील विडूळ परिसरात भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि २१ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निष्काळजी वाहनचालकाविरोधात उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत शेतकऱ्याचे नाव आनंता देविदास धुळे ४५, रा. विडूळ ता. उमरखेड असे आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ रावनाजी देविदास धुळे यांनी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये जबानी रिपोर्ट दिला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंता धुळे हे नेहमीप्रमाणे दि. २१ मे रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान शेतातील दुध आणण्यासाठी सायकलने घरातून निघाले होते. विडूळ गावासमोरील ढाणकी रोडवरील दिल्लेवार व गणेश रणमले यांच्या शेताजवळून ते सायकलने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 32 Y 5028 या कारच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या सायकलला समोरून जोरदार धडक दिली.या भीषण धडकेत आनंता धुळे हे रस्त्यावर फेकले गेले. अपघातात त्यांच्या डोक्याला, छातीला, पायाला व नाकाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ रावनाजी धुळे हे रुग्णालयात पोहोचले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती आनंता धुळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले असून मृतकाचा पार्थिव शरीर श्वविच्छेदना करीता पाठवण्यात आले असून प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमर खिल्लारे व पोलीस कर्मचारी दीपक वाघमारे करीत आहेत तर या प्रकरणी कार चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार दिलीप चव्हाण करीत आहेत.







