उमरखेड: ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक: दिलीप मुनेश्वर
उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत यावर्षी शहरातील ७१ व ग्रामीण भागातील १२९ अशा एकूण २०० गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. यापैकी शहरातील ७१ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन शुक्रवारी, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. तर ग्रामीण भागातील १२९ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन शनिवारी, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. विसर्जन मार्गावरील लाईटिंगची व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि बॅरीकेटींगचे काम पूर्ण झाले असून, पैनगंगा घाटावर पुरेसा प्रकाश, क्रेन, लाईव्ह जॅकेट आणि प्रशिक्षित पोहणाऱ्या युवकांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुकीत बदल आणि पर्यायी मार्ग
२५ सप्टेंबर रोजी विसर्जनादरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकारी (SDM), उमरखेड यांनी २३ सप्टेंबर रोजी आदेश काढून शहरातील मुख्य प्रवेश मार्ग बंद केले आहेत.
बंद राहणारे मार्ग:
महागाव बायपासकडून उमरखेडमध्ये येणारा रस्ता
दहागाव शाळेपासून उमरखेडकडे येणारा पुसद रोड
ढाणकी रोड उड्डाणपुलापासून शहरात येणारा रस्ता
नांदेडकडून १३३ केव्ही / पटेल पेट्रोलपंपापासून शहरात येणारा रस्ता
करोडी रोड कॅनॉलपासून शहरात येणारा रस्ता
पर्यायी मार्ग:
नांदेडकडे जाणारी वाहने: महागाव बायपास ते ढाणकी पूल बायपास मार्गे पुढे जातील.
पुसदकडे जाणारी वाहने: दहागाव शाळेपासून कॅनॉल रोडने तसेच बिटरगाव रोड कॅनॉल रस्त्याने जातील.
ढाणकी रोडकडून जाणारी वाहने: उड्डाणपुलापासून बायपास महागाव रोडचा वापर करतील.
करोडी रोडकडून येणारी वाहने: कॅनॉल रस्त्याने जातील.
पारंपरिक वाद्यांचाच वापर करण्याचे आवाहन; डॉल्बीवर कडक बंदीमिरवणुकीत केवळ पारंपरिक वाद्यांचाच (उदा. लेझीम पथक, ढोल-ताशे, बँड पथक, डफडे) वापर करावा. जिल्हाधिकारी यवतमाळ आणि पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – २०२३ च्या कलम १६३ अन्वये डॉल्बी sound सिस्टीम (टॉप, मिड, बेस), प्लाझ्मा sound सिस्टीम, प्रेशरमिड sound सिस्टीम, लेझर लाईट आणि यासाठी मोडिफाय (Modify) केलेल्या वाहनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा सिस्टीम आणि वाहने मालकांनी स्वतःच्या ताब्यात सीलबंद स्थितीत ठेवावीत, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाने दिला आहे.
गणेश मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना:
स्वयंसेवक नेमावेत: पैनगंगा नदी (पूल) घाटावर जाताना महामार्गावरून डाव्या बाजूने सुरक्षितपणे जावे व यवतमाळकडून नांदेडकडे जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत. लहान मुलांची काळजी: विसर्जन मिरवणुकीत लहान मुलांना सोबत घेऊ नये. अंबोना तलाव येथे विसर्जनासाठी जाणाऱ्या मंडळांनी लहान मुले तलावाच्या कडेला जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रकाश व्यवस्था: प्रत्येक मंडळाने सोबत पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी. अडचण आल्यास संपर्क: तांत्रिक अडचण किंवा आपत्कालीन परिस्थितीमुळे विसर्जन वेळेत बदल झाल्यास तातडीने पोलीस ठाण्याला कळवावे. – पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरखेड







