उमरखेड : 24 मे ( राजहिरा लाईव्ह न्युज )
संपादक : दिलीप मुनेश्वर
गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुकळी (ता. उमरखेड) येथे शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेने जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत तरुणाचे नाव गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा) असे असून ते बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते होते.त्यांच्या अकाली आणि हिंसक मृत्यूमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.टोल नाक्यावरून सुरू झाला पाठलागमाहितीनुसार, यवतमाळ- महागाव मार्गाने एक बोलेरो पीक-अप वाहनात (क्र. एमएच २९ बीई ८९१५) मोठ्या प्रमाणावर गोवंश भरून कत्तलीसाठी उमरखेडच्या दिशेने नेण्यात येत होते. वाहनात १६ ते १७ गोवंश कोंबून नेण्यात येत असल्याचे कळते. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिजोरा टोल नाक्यावर या वाहनाने संशयास्पदरीत्या वेग वाढवला व हुलकावणी दिली. दरम्यान, टोल नाक्यावर गोवंश तस्करीवर लक्ष ठेवून असलेले बजरंग दलाचे काही कार्यकर्ते सतर्क झाले. त्यांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला. गजानन सुरोशे यांनीही आपल्या एस क्रॉस (क्र. एमएच १२ पीटी ८६३४) कारमधून संशयित बोलेरोचा पाठलाग केला.सुकळी गावात सापळा रचून दगड-लाकडांनी अमानुष मारहाणपाठलाग सुरू असताना बोलेरो चालकाने वाहन सुकळी गावाच्या दिशेने वळवले. सुरोशे यांचे वाहनही मागोमाग गावात शिरले. याच वेळी बोलेरोतील संशयित तस्कर अचानक बाहेर आले आणि त्यांनी गजानन सुरोशे यांच्या वाहनावर मोठमोठे दगड आणि लाकडांनी हल्ला चढवला.अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या संपूर्ण घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले असून एकुणच घटनाक्रम काळजाचा ठोका चुकविणारा आहे. भीषण दगडफेकीत गजानन सुरोशे गंभीर जखमी झाले. स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उमरखेड येथील रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.परिसरात तणाव; महागाव बंदची हाकया घटनेनंतर उमरखेड, महागावसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. बजरंग दलाने या हत्येचा तीव्र निषेध करत महागाव बंदची हाक दिली. रविवारी सकाळपासून कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरमन्यात पोलीस अधिक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाला गती दिली.आरोपींचा शोध सुरूया प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोवंश तस्करीच्या संशयातून घडलेल्या या खुनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, गजानन सुरोशे यांच्या हत्येचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. बोलेरो पीक अप वाहन सुकळी येथीलच असल्याची चर्चा आहे.







