उमरखेड , 27 नोव्हे ( राजहिरा लाईव्ह न्युज )
संपादक : दिलीप मुनेश्वर
राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माधवराव कदम होते . प्रमुख अतिथी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. इंगळे होते. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. एम. भगत यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून जगातील सर्वात मोठ्या संविधानातील उद्देश पत्रिकेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केले. सर्वसामान्य जनतेला माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे भारतीय नागरिकांनी संवैधानिक मूल्यांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत प्रमुख अतिथी डॉ. व्ही. एस. इंगळे यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आधुनिक जगात भारताचे अस्तित्व महासत्ता म्हणून मिरवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेच्या मूलभूत चौकटीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. तरुणांची संख्या सर्वाधिक असलेल्या आपल्या देशात संवैधानिक मूल्यांची जोपासना करून सर्वसामान्य जनतेपर्यंत रुजविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधवराव कदम यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद भगत व आभार प्रदर्शन तेजस्विनी कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.







