उमरखेड : ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक – दिलीप मुनेश्वर
एड्सच्या निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक असून समाजाच्या सर्वच घटकांनी याकामी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन समुपदेशक वैशाली धोंगडे यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या रेड रिबन क्लबच्यावतीने १३ डिसेंबर रोजी जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस. बी. वाघमारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक वैशाली धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एचआयव्ही व्हायरस आणि एड्स होण्यामागची कारणे यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. एड्स या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्रा. एस. बी. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जोपासून बांधीत व्यक्तींना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. प्रा. अभय जोशी यांनी विद्यार्थ्यांना एड्स निर्मूलनासाठी विविध सामाजिक संघटना आणि शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रा. एस. व्ही. सुर्वे आणि प्रा. ए. पी. मिटके उपस्थित होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. टी. एम. भगत यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी पल्लवी शिंदे हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी सुर्वे आणि वैष्णवी मोहळे यांनी केले तर आभार प्रदर्शन इशिता शिंगणकर यांनी मानले. ‘खरा तो एकची धर्म‘ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.







