*उमरखेड, दि. 5 डिसेंबर ( राजहिरा लाईव्ह न्युज)*
संपादक : दिलीप मुनेश्वर
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील अनेक अर्ज विद्यार्थी, तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. आवश्यक पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
या योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,व्यावसायिक अभ्यासक्रमांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन,व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना यांचा समावेश आहे.
विद्यार्थी स्तरावरील अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये ‘स्क्रुटिनी’ या पर्यायात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दि. 1 डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार महाविद्यालयांनी दि. 31 डिसेंबरपर्यंत सर्व प्रलंबित अर्जांची तपासणी करून त्यांना मंजूर किंवा नामंजूर या दोन पर्यायांपैकी एक निवडून अंतिम निर्णय नोंदविणे बंधनकारक आहे.
तरी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावेत आणि अपात्र अर्ज नामंजूर करावेत. प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर सादर होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नसून संबंधित महाविद्यालयांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. सर्व महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.







